शिंदखेडा नगरपंचायतीमध्ये सेवा बजावत असलेल्या ३२ रोजंदारी कामगारांच्या मासिक वेतनात प्रति कामगार ३ हजार रुपयांची वाढ मान्य करण्यात आली आहे. त्यामुळे या सर्व कामगारांची दिवाळी अत्यंत गोड आणि आनंदात गेली आहे. शहरातील स्वच्छता, सार्वजनिक आरोग्य, पाणीपुरवठा, बांधकाम, विद्युत व्यवस्था आणि इतर अनेक नागरी सुविधा अविरत सुरू ठेवण्यासाठी हे सर्व कामगार सातत्याने मोठे योगदान देत असतात.
ऊन, पाऊस असो किंवा कोणतीही प्रतिकूल परिस्थिती असो, शहराच्या सेवेसाठी हे लोक नेहमी तत्पर असतात. त्यांच्या याच मेहनतीची व योगदानाची दखल घेत नगरपंचायतीने हा मोठा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे नगरपंचायतीच्या तिजोरीवर दरमहा ९६ हजार रुपयांचा अतिरिक्त आर्थिक भार पडणार आहे. त्यानुसार यावर वार्षिक ११ लाख ५२ हजार रुपयांची अतिरिक्त तरतूद करावी लागणार आहे.
या सर्वसाधारण सभेला नगराध्यक्षा श्रीमती कलावती माळी, उपनगराध्यक्ष उदय देसले, मुख्याधिकारी श्रीकांत फागणेकर उपस्थित होते. तसेच सर्व नगरसेवक व नगरसेविका, प्रशासकीय अधिकारी सचिन वाघ, पाणीपुरवठा अभियंता विपुल साळुंखे आणि वरिष्ठ लिपिक विवेक डांगरीकर हेदेखील या वेळी उपस्थित होते. सर्वांच्या सहमतीने हा निर्णय घेण्यात आला.
कामगारांच्या आर्थिक हिताचा विचार करून त्यांच्या कष्टाचा व श्रमाचा सन्मान करणारा हा निर्णय अत्यंत महत्त्वाचा ठरला आहे. या सकारात्मक पावलामुळे सर्व कामगारांच्या कुटुंबात आनंदाचे वातावरण पसरले असून ही त्यांच्यासाठी दिवाळीची एक सुंदर भेट ठरली आहे.