ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड क्षमता दडलेली असून योग्य मार्गदर्शन, आधुनिक शिक्षण आणि आवश्यक सुविधा मिळाल्यास हेच विद्यार्थी उद्याच्या महाराष्ट्राचे आणि देशाचे भविष्य घडवतील, असा विश्वास राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार यांनी व्यक्त केला.
'शाळा प्रवेशोत्सव २०२६' निमित्त मावळ तालुक्यातील पीएम श्री आदर्श केंद्र जिल्हा परिषद शाळेला त्यांनी सदिच्छा भेट दिली. यावेळी विद्यार्थ्यांशी मनमोकळा संवाद साधत त्यांच्या शिक्षण, स्वप्नं आणि भविष्यातील ध्येयांविषयी जाणून घेतले.
"शाळा हा माझ्या अत्यंत जिव्हाळ्याचा विषय आहे," असे सांगत सुनेत्राताई पवार यांनी शालेय जीवनातील आठवणींनाही उजाळा दिला. विद्यार्थ्यांना केवळ शिक्षणच नव्हे तर आत्मविश्वास, संस्कार, तंत्रज्ञानाची ओळख आणि आयुष्यात मोठी स्वप्ने पाहण्याची प्रेरणा देणे ही शिक्षण व्यवस्थेची खरी जबाबदारी असल्याचे त्यांनी नमूद केले.
यावेळी विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले. तसेच जिल्ह्यातील ३०३ केंद्रप्रमुखांना टॅब वितरण उपक्रमांतर्गत प्रातिनिधिक स्वरूपात टॅबचे वाटप करण्यात आले. डिजिटल शिक्षणाला चालना देण्यासाठी शासन सातत्याने प्रयत्नशील असून प्रत्येक विद्यार्थ्यापर्यंत आधुनिक तंत्रज्ञान पोहोचवण्याचा संकल्प असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
कार्यक्रमादरम्यान शाळेची विद्यार्थिनी कु. रुद्रा गणेश राजगुरे हिचा विशेष गौरव करण्यात आला. चाचणी परीक्षेत उल्लेखनीय यश मिळवत नासा भेटीची संधी मिळविल्याबद्दल सुनेत्राताई पवार यांनी तिचे अभिनंदन केले. विद्यार्थ्यांची क्षमता योग्य संधी मिळाल्यास जागतिक स्तरावर झेप घेऊ शकते, याचे हे उत्तम उदाहरण असल्याचे त्यांनी सांगितले.
शाळेतील डिजिटल क्लासरूम, संगणक प्रयोगशाळा आणि आधुनिक शैक्षणिक सुविधांची पाहणी करताना त्यांनी शिक्षक व विद्यार्थ्यांचे कौतुक केले. आजचे युग कृत्रिम बुद्धिमत्ता (AI), विज्ञान आणि तंत्रज्ञानाचे असून प्रत्येक विद्यार्थी या स्पर्धेत सक्षमपणे सहभागी व्हावा, यासाठी शासन सर्वतोपरी प्रयत्न करत असल्याचे त्यांनी नमूद केले.
अभ्यासाबरोबरच विद्यार्थ्यांनी क्रीडा क्षेत्रातही राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर यश संपादन करावे, यासाठी राज्यभर क्रीडांगणे आणि आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यात येत असल्याची माहिती त्यांनी दिली. शिक्षणासोबतच खेळ, विज्ञान, संशोधन आणि नवोपक्रम यामध्येही विद्यार्थ्यांनी आपली ओळख निर्माण करावी, असे आवाहन त्यांनी केले.
यावेळी विद्यार्थ्यांमध्ये उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार यांच्याबद्दल विशेष उत्साह पाहायला मिळाला. अनेक विद्यार्थ्यांनी त्यांच्यासोबत सेल्फी काढत आनंद व्यक्त केला. सुनेत्राताईंनीही विद्यार्थ्यांशी अगदी आपुलकीने संवाद साधत त्यांच्या उत्साहात सहभागी होत संस्मरणीय क्षण अनुभवले.
मा. सुनेत्रावहिनींचा आपुलकीचा स्वभाव आणि विद्यार्थ्यांशी तसेच शिक्षकांशी साधलेला सहज संवाद उपस्थितांच्या विशेष पसंतीस उतरला. प्रत्येक विद्यार्थ्याच्या प्रगतीबाबत असलेली त्यांची तळमळ आणि शिक्षण क्षेत्राविषयीचा जिव्हाळा यामुळे कार्यक्रमात आत्मीयतेचे वातावरण निर्माण झाले होते.
उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी शिक्षण क्षेत्राच्या बळकटीसाठी सातत्याने घेतलेल्या निर्णयांमुळे जिल्हा परिषद शाळांमध्ये मोठे सकारात्मक बदल घडून आले आहेत. आधुनिक वर्गखोल्या, डिजिटल शिक्षण, संगणक प्रयोगशाळा, क्रीडा सुविधा आणि विद्यार्थीकेंद्रित उपक्रमांच्या माध्यमातून दर्जेदार शिक्षणाची नवी दारे खुली झाली आहेत. याच विकासदृष्टीला पुढे नेत सुनेत्राताई पवार यांनी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शासन कटिबद्ध असल्याचा विश्वास व्यक्त केला.
कार्यक्रमाच्या शेवटी शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, पालक आणि शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांचे अभिनंदन करत सुनेत्राताई पवार यांनी सर्व विद्यार्थ्यांना नव्या शैक्षणिक वर्षासाठी शुभेच्छा दिल्या. शिक्षणाच्या माध्यमातून सक्षम, सुसंस्कृत, तंत्रज्ञानस्नेही आणि आत्मविश्वासपूर्ण पिढी घडविण्यासाठी शासन सातत्याने कार्यरत राहील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.