Tuesday, 27 October 2026 Pune, Maharashtra
पुणे

मंचर एसटी आगारात ‘राजमाता जिजाऊ’च्या पाच नव्या बस दाखल

मंचर एसटी आगाराच्या ताफ्यात पाच नव्या ‘राजमाता जिजाऊ’ बस दाखल झाल्या आहेत. आणखी पाच बस लवकरच मिळणार असून, ग्रामीण मार्गांवरील फेऱ्या वाढवण्याचे नियोजन असल्याची माहिती आगारप्रमुखांनी दिली.

पुणे वार्ता डेस्क
17 Oct 2026, 06:43 PM
5,454 वाचले
News Image

ग्रामीण भागातील प्रवाशांसाठी मंचर एसटी आगाराच्या ताफ्यात पाच नव्या ‘राजमाता जिजाऊ’ बस दाखल झाल्या आहेत. शुक्रवारी (ता. १६) या बस आगारात आल्या. त्यामुळे ग्रामीण भागातील प्रवासी, महाविद्यालयीन विद्यार्थी आणि नोकरदारांना दिलासा मिळण्याची अपेक्षा आहे. आणखी पाच नव्या बस लवकरच मिळणार असल्याने आगाराच्या सेवेत वाढ होईल.

मंचर एसटी आगार सुरू होऊन चार वर्षे झाली आहेत. सुरुवातीच्या काळात अन्य आगारांतून जुन्या बस उपलब्ध होत असल्याने प्रवाशांना अडचणींचा सामना करावा लागत होता. बसची कमतरता आणि प्रवाशांची वाढती संख्या यामुळे ग्रामीण मार्गांवरील वाहतुकीवरही ताण येत होता.

ही परिस्थिती लक्षात घेऊन माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी एसटी महामंडळाकडे पाठपुरावा केला. त्यांच्या प्रयत्नांनंतर दीड वर्षापूर्वी आगाराला दहा नव्या बस मिळाल्या होत्या. आता त्यात ‘राजमाता जिजाऊ’च्या पाच बसची भर पडली आहे.

सध्या मंचर आगाराच्या ताफ्यात २९ बस असून, त्याद्वारे तालुक्यातील विविध गावांसह लांब पल्ल्याच्या मार्गांवर प्रवासी वाहतूक केली जाते. नव्या बस उपलब्ध झाल्यानंतर तालुक्यातील विविध मार्गांवर फेऱ्या वाढवण्यात येतील, अशी माहिती मंचर आगारप्रमुख आरिफ पटेल यांनी दिली.

“मंचर एसटी आगाराला आणखी पाच नव्या बस मिळणार आहेत. ग्रामीण भागातील प्रवासी, विद्यार्थी आणि नागरिकांना सुरक्षित व आरामदायी प्रवासाची सुविधा मिळावी, हा यामागील मुख्य उद्देश आहे. पहिल्या टप्प्यात पाच बस दाखल झाल्या असून, आणखी पाच बस लवकरच उपलब्ध होतील,” असे पटेल यांनी सांगितले.