पुणे शहरात डेंग्यूच्या वाढत्या संकटाने पुणेकरांची डोकेदुखी आधीच वाढवली होती, पण आता स्वाइन फ्लूने देखील डोके वर काढले आहे. आरोग्य विभागाच्या आकडेवारीनुसार स्वाइन फ्लूच्या प्रादुर्भावात पुणे शहर संपूर्ण राज्यात सर्वात पुढे आहे. जानेवारी ते ऑक्टोबर या १० महिन्यांच्या काळात पुणे महानगरपालिका हद्दीत ८७९ रुग्णांची नोंद झाली असून ३ जणांचा मृत्यू झाला आहे. पुण्यापाठोपाठ मुंबई आणि नागपूरमध्ये सर्वाधिक रुग्णांची नोंद झाली आहे.
राज्यभरात जानेवारी ते ऑक्टोबर या काळात १३ लाख १० हजार ४४३ जणांची तपासणी करण्यात आली. यात ४३७५ संशयित रुग्ण आढळले, तर २८५८ जणांना स्वाइन फ्लूची लागण झाल्याचे निष्पन्न झाले आणि ३४ जणांचा बळी गेला. यातील सर्वाधिक ७८९ रुग्ण पुणे महानगरपालिका हद्दीतील आहेत. पिंपरी-चिंचवडमध्ये १५९ रुग्ण आढळले आहेत. मुंबईत ६४८, तर नागपुरात ४९३ रुग्ण नोंदवले गेले आहेत.
या वाढत्या धोक्यावर मात करण्यासाठी आरोग्य विभागाने बचावात्मक उपाययोजना सुरू केल्या आहेत. अतिजोखमीच्या व्यक्तींसाठी मोफत आणि ऐच्छिक लसीकरण सुरू करण्यात आले आहे. यात गर्भवती महिला, मधुमेह व उच्च रक्तदाब असलेल्या व्यक्ती आणि अध्यापकांपासून ते आरोग्य कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. तसेच सरकारी व खासगी रुग्णालयांमध्ये ऑसिल्टॅमिवीर या औषधाचा पुरेसा साठा ठेवण्यात आला असून चाचण्यांवर भर दिला जात आहे.
आरोग्य यंत्रणेने संशयित रुग्णांचे सर्वेक्षण वाढवले असून उपजिल्हा रुग्णालये आणि वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये विलगीकरण कक्ष तयार केले आहेत. पुणेकरांनी हवामानातील बदलादरम्यान आरोग्याची काळजी घ्यावी आणि कोणतीही लक्षणे दिसल्यास तत्काळ तपासणी करून घ्यावी, असे आवाहन करण्यात येत आहे. या दुहेरी संकटाचा सामना करताना नागरिकांनी सतर्क राहणे गरजेचे ठरत आहे.