पुण्यातील मुकुंदनगर भागातील एका इमारतीत विवाहितेने जीवन संपवल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. स्वारगेट पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या या प्रकारामुळे एकच खळबळ उडाली आहे. पायल अक्षय झांबरे असे मृत महिलेचे नाव असून ती एका IT कंपनीत काम करत होती. तिचा विवाह सुमारे ५ वर्षांपूर्वी झाला होता आणि या दाम्पत्याला एक मुलगी आहे.
मुकुंदनगरमधील अक्षय हाईट्स सोसायटीमधील जुन्या फ्लॅटमध्ये सोमवारी हा प्रकार उघडकीस आला. रविवार रातपासून पायल दिसत नसल्याची माहिती तिच्या चुलत सासूने दिली होती. त्यानंतर कुटुंबीयांनी तिथे धाव घेतली असता ती मृत अवस्थेत आढळली. दिवाळीच्या काळात सोन्याची मागणी पूर्ण न केल्यामुळे तिचा छळ झाल्याचा दावा माहेरच्या लोकांनी केला आहे. या वादातूनच माहेरच्या मंडळींनी झांबरे पॅलेस मंगल कार्यालयाची तोडफोड केली आहे.
घटनेची माहिती मिळताच स्वारगेट पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. मृतदेह शवविच्छेदनासाठी ससून रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. माहेरच्या लोकांच्या म्हणण्यानुसार, दरवर्षी ५ ते १० तोळे सोन्याची मागणी केली जात होती आणि यंदा ती न दिल्याने दबाव वाढवला गेला. या गंभीर आरोपांनंतर पोलीस आता या संपूर्ण प्रकरणाचा कसून तपास करत आहेत.
पुण्यासारख्या शहरात हुंड्यासारख्या कारणांमुळे एका उच्चशिक्षित महिलेचा जीव गेल्याने पुणेकरांमध्ये हळहळ व्यक्त होत आहे. या घटनेमुळे महिला सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून दोषींवर कडक कारवाईची मागणी होत आहे. पोलीस तपासात पुढे काय समोर येते आणि कोणता न्याय मिळतो, यावर सर्वांची नजर आहे.