जांभूळवाडी-कोळेवाडी, आंबेगाव खुर्द आणि स्वामीनारायण टेकडी परिसरात मोठ्या प्रमाणावर डोंगरफोड, अवैध उत्खनन आणि सपाटीकरण सुरू असल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.
स्थानिकांच्या माहितीनुसार, परिसरात दिवसाढवळ्या जेसीबी, पोकलॅन आणि इतर अवजड यंत्रांच्या साहाय्याने डोंगर पोखरण्याचे काम सुरू आहे. हिरवाईने नटलेल्या डोंगररांगा मोठ्या प्रमाणावर सपाट करण्यात येत असून नैसर्गिक सौंदर्य नष्ट होत असल्याची खंत व्यक्त केली जात आहे.
या उत्खननामुळे हजारो झाडांची तोड झाली असून नैसर्गिक नाले, ओढे आणि जलवाहिन्या बुजवल्या जात असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. परिणामी भविष्यात पावसाळ्यात पूरस्थिती, भूस्खलन आणि भूजल पातळी घटण्याचा धोका वाढण्याची शक्यता तज्ज्ञांकडून व्यक्त केली जात आहे.
स्थानिकांनी महसूल विभाग आणि संबंधित प्रशासनावर गंभीर आरोप करत अवैध उत्खननाकडे हेतुपुरस्सर दुर्लक्ष होत असल्याचे म्हटले आहे. काही ठिकाणी हजारो ब्रास उत्खनन झाले असतानाही किरकोळ पंचनामे करून कारवाई केल्याचा आरोप होत आहे.
दरम्यान, हवेलीच्या तहसीलदार अर्चना निकम यांनी या प्रकरणी स्पष्टीकरण देताना प्रशासनाकडून कारवाई सुरू असल्याचे सांगितले. ईटीएस प्रणालीद्वारे उत्खननाचे मोजमाप करण्यात येत असून दोषींवर दंडात्मक कारवाई केली जात असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
या संपूर्ण प्रकरणामुळे पुण्यातील पर्यावरण संवर्धनाचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून नागरिकांनी तातडीने कठोर कारवाईची मागणी केली आहे.