Sunday, 01 November 2026 Pune, Maharashtra
पुणे

पुण्यातील जुन्नर भागात पडलेल्या पावसाचा द्राक्ष बागांना मोठा फटका

जुन्नर तालुक्यात शुक्रवारी झालेल्या अवकाळी पावसामुळे द्राक्ष उत्पादक शेतकरी अडचणीत आले आहेत. या पावसामुळे द्राक्ष पिकांवर विविध रोग पडण्याची भीती निर्माण झाली आहे.

संपादकीय विभाग
31 Oct 2026, 07:01 PM
5,196 वाचले
News Image

पुणे जिल्ह्यातील जुन्नर भागात ३० ऑक्टोबर रोजी रातच्या वेळी पडलेल्या पावसाने द्राक्ष पिकाचे मोठे नुकसान केले आहे. या परिसरात ८.४ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. यामुळे वातावरणात एकदम गारवा निर्माण झाला असून या हवामानाचा थेट वाईट परिणाम द्राक्ष बागांवर झाला आहे. फुलोरा आणि पोंगा अवस्थेत असलेल्या बागांमध्ये आता घडकूज होण्याचा धोका वाढल्याने शेतकरी वर्ग चिंतेत सापडला आहे.

कृषी विज्ञान केंद्राचे प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. प्रशांत शेटे आणि तालुका कृषी अधिकारी प्रवीण नंदकुळे यांनी दिलेल्या माहितीनुसार या भागात ऑक्टोबरमध्ये सहसा ५६.३ मिलिमीटर पाऊस पडतो. पण यंदा ८.९ मिलिमीटर पाऊस नोंदवला गेला. शुक्रवारी झालेल्या पावसात पिंपळगाव जोगे धरण भागात सर्वाधिक १६ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. जुन्नर परिसरात सुमारे ३ हजार एकर भागात द्राक्ष बागा असून २५ सप्टेंबरपासून फळ छाटणीची कामे सुरू झाली होती.

सध्या बागा विविध टप्प्यांत असतानाच आलेल्या पावसामुळे द्राक्ष वेलींवर कीड, डावणी आणि बुरशीजन्य आजार पसरण्याची शक्यता बळावली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना रोगांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी दुपारनंतर औषधांची फवारणी करावी लागत आहे. शनिवार ३१ ऑक्टोबर रोजीसुद्धा दिवसभर ढगाळ हवामान असल्याने शेतात औषध फवारणीचे काम वेगाने सुरू ठेवण्यात आले होते.

या अवकाळी संकटामुळे द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना पुढील दोन ते तीन दिवस सतत फवारणी करावी लागणार आहे. द्राक्ष उत्पादक हरिभाऊ वायकर आणि अवधूत बारवे यांनी सांगितले की या फवारणीमुळे शेतकऱ्यांचा एका एकराला तब्बल १० ते १५ हजार रुपयांचा जास्तीचा खर्च करावा लागत आहे. गेल्या वर्षी घड निर्मिती न झाल्याने संपूर्ण हंगाम वाया गेला होता, यंदा घड चांगले आले असताना पावसाने पुन्हा शेतकऱ्यांची चिंता वाढवली आहे.