पुणे: पुण्यातील रहिवाशांसाठी एक मोठी आनंदाची बातमी समोर येत आहे. कात्रज ते येरवडा दरम्यान प्रस्तावित 'डबल डेकर ट्विन टनेल'मुळे शहरातील अनेक महत्त्वाच्या भागांपर्यंत पोहोचणे आता अतिशय सुकर होणार आहे.
पुणे वार्ताने मिळवलेल्या माहितीनुसार, या प्रकल्पांतर्गत कोथरूडला जाण्याचा प्रवास 65 मिनिटांवरून केवळ 7 मिनिटांवर येणार असल्याचे सल्लागार संस्थेच्या अहवालात नमूद केले आहे. हे ऐकून पुणेकर नागरिक अवाक झाले आहेत.
नागरिकांचे म्हणणे आहे की पुण्यातील वाहतुकीची समस्या इतकी गंभीर झाली आहे की अनेकांना नोकरी, शिक्षण आणि व्यवसायासाठी जड किंमत मोजावी लागत आहे. हा प्रकल्प पुणेकरांचे जीवन सुसह्य करेल, अशी आशा व्यक्त होत आहे.
जाणकारांच्या मते, या बोगद्यांमुळे शहरातील वाहतुकीत 15 ते 22 टक्के घट होऊ शकते. एकूण 54 किमी लांब भुयारी मार्गांच्या जाळ्यासाठी 36,415 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. सुमारे 54 हेक्टर जमीन संपादन करावे लागणार असल्याचाही प्राथमिक अंदाज आहे.
17.6 मीटर व्यासाच्या बोगद्यात एकाच वेळी दोन्ही दिशांची वाहतूक होणार असल्याने जमीन संपादन कमी होईल आणि पर्यावरणीय परिणामही मर्यादित राहतील, असे सूत्रांनी सांगितले.
'येरवडा-हिंजवडी' आणि 'येरवडा-खडी मशिन' या मार्गांनाही प्राधान्य दिले जाणार आहे. बोगद्यांमध्ये आपत्कालीन एस्केप रूटही असणार आहेत.
हा प्रकल्प बीओटी तत्त्वावर 40 वर्षांसाठी राबविण्याचा विचार असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या घोषणेनंतर एसपीव्ही स्थापनेच्या दिशेने हालचाली सुरू झाल्या आहेत, असे जाणकारांच्या मते सांगण्यात येत आहे.