पुणेकरांच्या दैनंदिन खर्चात पुन्हा एकदा वाढ होणार असून महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेड (MNGL) ने CNG आणि PNG दरात वाढ जाहीर केली आहे. १६ जूनच्या मध्यरात्रीपासून लागू झालेल्या या नव्या दरांमुळे वाहनधारकांसह घरगुती ग्राहकांनाही अतिरिक्त आर्थिक भार सहन करावा लागणार आहे.
नवीन दरांनुसार CNGच्या किमतीत प्रतिकिलो १ रुपयांची वाढ झाली असून दर ९५.७५ रुपयांवर पोहोचला आहे. तसेच घरगुती वापरासाठीच्या PNGच्या दरात ८५ पैशांची वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे महिन्याच्या बजेटचे गणित पुन्हा एकदा बिघडण्याची शक्यता आहे.
पुण्यात मोठ्या प्रमाणावर रिक्षा, कॅब, शालेय वाहने आणि खासगी चारचाकी CNGवर चालतात. त्यामुळे या दरवाढीचा थेट परिणाम वाहतूक क्षेत्रावर होणार असून, पुढील काळात प्रवासी भाड्यांमध्ये वाढ होण्याची शक्यता नाकारता येत नाही. दुसरीकडे PNG वापरणाऱ्या हजारो कुटुंबांच्या स्वयंपाकघरातील खर्चातही वाढ होणार आहे.
गेल्या काही महिन्यांपासून जीवनावश्यक वस्तू, वीज आणि इतर सेवांच्या वाढत्या किमतींमुळे नागरिक आधीच आर्थिक तणावात आहेत. अशात CNG-PNG दरवाढीने सर्वसामान्यांच्या खिशाला आणखी कात्री लागणार असल्याची भावना व्यक्त होत आहे.
दरम्यान, नैसर्गिक वायू खरेदी खर्चातील वाढ आणि बाजारातील बदलत्या परिस्थितीमुळे दरवाढ आवश्यक असल्याचे कंपनीकडून स्पष्ट करण्यात आले आहे. मात्र, वाढत्या महागाईच्या काळात ही दरवाढ पुणेकरांसाठी चिंतेचा विषय ठरत आहे.
शहरातील वाहनधारक, रिक्षाचालक आणि गृहिणींमध्ये या निर्णयाबाबत नाराजीचे सूर उमटत असून, पुढील काळात इंधन दरांमध्ये आणखी वाढ होते का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.