पुणेरी मेट्रोच्या नव्या मार्गाचा आरंभ मंगळवार रोजी झाल्यानंतर, बुधवारपासून हा मार्ग सर्वसामान्यांसाठी खुला करण्यात आला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी या मार्गावर पहिला प्रवास केला. मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्वतः तिकीट खरेदी करून या प्रवासाचा आनंद घेतला आणि व्यवस्थेची पाहणी केली. या ऐतिहासिक प्रवासात महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक श्रावण हर्डीकर तसेच पीएमआरडीएचे महानगर आयुक्त अभिजित चौधरी यांनी मुख्यमंत्र्यांना प्रकल्पाची माहिती दिली.
या सोहळ्यात केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, राज्यमंत्री माधुरी मिसाळ, पुण्याच्या महापौर मंजुषा नागपुरे, पिंपरी चिंचवडचे महापौर रवी लांडगे यांच्यासह अनेक अधिकारी व लोकप्रतिनिधी उपस्थित होते. या मेट्रोचे सर्वात मोठे आकर्षण म्हणजे हिची धुरा महिलांच्या हाती आहे. लीड ट्रेन पायलट प्रगती बिरादार यांनी मेट्रोचे सारथ्य केले असून, ट्रेन पायलट ऐश्वर्या सूर्यपूजारी यांनी त्यांना मदत केली. माण, हिंजवडी, शिवाजीनगर ते डिस्ट्रीक कोर्ट अशी २३.२०३ किलोमीटर लांबीची ही उन्नत मार्गिका आहे. या प्रकल्पासाठी ८ हजार ३१३ कोटी रुपये खर्च आला असून, यात ९० महिला चालक मेट्रो चालवणार आहेत.
प्रवासादरम्यान मुख्यमंत्री फडणवीस यांनी शालेय मुली आणि आयटीयन्सशी संवाद साधून त्यांच्याकडून अभिप्राय घेतला. वाहतूक कोंडीच्या त्रासातून सुटका करून देणारा हा प्रवास सुखद असल्याचा अनुभव मान्यवरांनी घेतला. हा देश पातळीवरील पहिला सार्वजनिक-खासगी भागीदारी पद्धतीचा मेट्रो प्रकल्प आहे. एकूण २३ पैकी १७ स्थानके सध्या सुरू करण्यात आली असून, उर्वरित स्थानके लवकरच खुली होणार आहेत. या मार्गावर किमान १२ आणि कमाल ६२ रुपये तिकीट आकारण्यात येणार असून, हजारो प्रवाशांना याचा थेट फायदा मिळणार आहे.
बुधवारपासून सकाळी सहा वाजता ही सेवा नागरिकांसाठी सुरू झाली आहे. डिस्ट्रीक कोर्ट स्थानकावरून रात ११.४० वाजता शेवटची मेट्रो सुटणार असून, माण येथून रात १०.३० वाजता शेवटची गाडी धावणार आहे. हिंजवडीच्या आयटी हबला थेट पुणे शहराशी जोडणाऱ्या या मेट्रोमुळे रोज ये-जा करणाऱ्या चाकरमान्यांचा मोठा वेळ वाचणार आहे. महिला सक्षमीकरणाचा नवा पायंडा पाडणारी ही पिंक मेट्रो पुणेकरांच्या दैनंदिन प्रवासाचे चित्र पूर्णपणे बदलून टाकणार आहे.