गेल्या दोन दिवसांत बारामती शहर आणि तालुक्यात वादळी वाऱ्यांसह झालेल्या पावसामुळे अनेक भागांमध्ये जनजीवन विस्कळीत झाले. शहरातील प्रमुख मार्गांवर वृक्ष कोसळल्याने वाहतुकीवर परिणाम झाला, तर काही भागांमध्ये नागरिकांना दैनंदिन कामकाजात अडचणींचा सामना करावा लागला. या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार यांनी प्रत्यक्ष घटनास्थळी भेट देत परिस्थितीचा सविस्तर आढावा घेतला.
सकाळीच विविध भागांची पाहणी करत त्यांनी प्रशासनाकडून सुरू असलेल्या कामांची माहिती घेतली. रस्त्यांवरील अडथळे तातडीने दूर करणे, वाहतूक सुरळीत करणे आणि नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने आवश्यक ती पावले उचलणे याबाबत त्यांनी अधिकाऱ्यांना स्पष्ट सूचना दिल्या.
बारामतीच्या विकासात पर्यावरण संवर्धनाचा महत्त्वाचा वाटा राहिला आहे. त्यामुळे वादळामुळे नुकसान झालेल्या वृक्षांबाबतही संवेदनशील भूमिका घेण्याचे निर्देश देण्यात आले. जी झाडे मुळासकट उन्मळून पडली असून त्यांचे संवर्धन शक्य आहे, अशा वृक्षांचे पुनर्रोपण करण्यासाठी विशेष प्रयत्न करावेत, असे त्यांनी सांगितले.
बारामतीमध्ये विकासकामे आणि पर्यावरण यांचा समतोल राखण्याचा प्रयत्न सातत्याने होत आला आहे. रस्त्यांच्या दुतर्फा उभी असलेली हिरवळ आणि शहराची हरित ओळख कायम राखण्यासाठी प्रशासनाने दीर्घकालीन नियोजन करावे, असे मत यावेळी व्यक्त करण्यात आले.
राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी अनेक वर्षे बारामतीच्या विकासासाठी प्रत्यक्ष मैदानात उतरून काम करण्याची कार्यपद्धती जपली. संकटाच्या काळात घटनास्थळी पोहोचून परिस्थितीची माहिती घेणे आणि प्रशासनाला गती देणे ही त्यांची शैली राहिली आहे. त्याच जनसंपर्क आणि कार्यतत्परतेच्या परंपरेचा प्रत्यय सुनेत्राताई पवार यांच्या पाहणी दौऱ्यातूनही दिसून आला.
यावेळी सुनेत्राताई पवार यांनी बारामतीकरांना आश्वस्त करत सांगितले की, “जनतेच्या दैनंदिन जीवनात अडथळा निर्माण होऊ नये आणि प्रत्येक समस्या वेळेत मार्गी लागावी यासाठी माझे सातत्याने लक्ष आहे. बारामतीकरांच्या सेवेसाठी आम्ही सदैव कटिबद्ध आहोत.”
नुकसानग्रस्त भागातील परिस्थिती लवकरात लवकर पूर्ववत व्हावी, नागरिकांना कोणतीही अडचण भासू नये आणि सर्व समस्या वेळेत सोडविल्या जाव्यात यासाठी प्रशासनाला सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या.