Friday, 13 November 2026 Pune, Maharashtra
पुणे

दिवाळीत आगीच्या दुर्घटना रोखण्यासाठी पिंपरीत २५० अग्निशमन कर्मचारी राहणार सज्ज

पिंपरी-चिंचवड शहरात दिवाळीत आगीच्या घटना टाळण्यासाठी महापालिकेने २५० जणांचे पथक तैनात केले आहे. आपत्कालीन परिस्थितीसाठी २४ तास यंत्रणा कार्यरत असून नागरिकांना सुरक्षेचे आवाहन केले आहे.

संपादकीय विभाग
08 Nov 2026, 09:16 AM
8,688 वाचले
News Image

पुणे जिल्ह्याचे औद्योगिक केंद्र असलेल्या पिंपरी-चिंचवडमध्ये दिवाळीचा आनंद सुरक्षित राहावा, यासाठी महापालिकेने कंबर कसली आहे. फटाके फोडताना घडणाऱ्या दुर्घटना टाळण्याच्या उद्देशाने अग्निशमन विभागाने २५० कर्मचाऱ्यांचे विशेष पथक तयार केले आहे. शहरातील २० मोठी अग्निशमन वाहने आणि ७ ते ८ गाड्यांच्या माध्यमातून गस्ती घालण्यात येणार असून, गर्दीच्या आणि संवेदनशील भागांवर विशेष नजर ठेवली जाणार आहे.

मागील वर्षी दिवाळीच्या दिवसांत आगीच्या सुमारे ७० दुर्घटना नोंदवल्या गेल्या होत्या. या भूतकाळातील अनुभवाचा अभ्यास करून प्रशासनाने धोके टाळण्याचे नियोजन केले आहे. सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द करण्यात आल्या असून यंत्रणा २४ तास सज्ज ठेवण्यात आली आहे. शगुन चौक, पिंपळे गुरव, वाकड, डांगे चौक, जगताप डेअरी, रावेत यांसारख्या गर्दीच्या ठिकाणांवर विशेष लक्ष केंद्रित करण्यात आले आहे.

शहरात १२५ डेसिबल मर्यादेतील ग्रीन फटाके विक्रीलाच परवानगी असून, इतर पारंपरिक फटाक्यांच्या वापरावर बंदी घालण्यात आली आहे. अग्निशमन विभागाचे उपायुक्त व्यंकटेश दुर्वास यांनी याबद्दल माहिती दिली आहे. आयुक्तांनी नागरिकांना सुरक्षिततेच्या नियमांचे पालन करण्याचे आवाहन केले असून, आपत्कालीन संपर्कासाठी मुख्यालयासह विविध केंद्रांचे दूरध्वनी क्रमांक जाहीर करण्यात आले आहेत.

नागरिकांनी गर्दीच्या भागात किंवा वाहनां जवळ फटाके फोडणे टाळावे आणिजवळ पाण्याची बादली ठेवावी. कोणतीही दुर्घटना घडल्यास स्वतः प्रयत्न न करता तातडीने अग्निशमन विभागाशी संपर्क साधावा. या नियोजनबद्ध तयारीमुळे पुणेकरांची दिवाळी अधिक आनंदात आणि निर्विघ्नपणे पार पडण्यास मदत होणार आहे.