चीनमधील किंगदाओ बंदरात मालवाहू जहाजाला लागलेल्या भीषण आगीत २५ जणांचा मृत्यू झाला आहे. ‘ओशन मेलडी’ नावाचे हे परदेशी ध्वज असलेले मालवाहू जहाज दुरुस्तीच्या कामासाठी किंगदाओ बेईहाय शिपयार्डमध्ये उभे होते. गुरुवारी सकाळी सुमारे ११.१५ वाजता जहाजावर आग लागल्याची माहिती समोर आली.
आग लागली त्यावेळी जहाजावर एकूण ४२ जण उपस्थित होते. बचाव पथकांनी १२ जणांना सुरक्षित बाहेर काढले, तर पाच जण जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. जखमींची प्रकृती स्थिर असल्याचे अधिकृत माहितीत सांगण्यात आले आहे.
सुमारे तीन तासांच्या प्रयत्नांनंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले. स्थानिक माहितीनुसार दुपारी सुमारे २.३० वाजता आगीच्या ज्वाळा विझवण्यात आल्या. मात्र, दुर्घटनेचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.
‘ओशन मेलडी’ हे लाइबेरियाच्या ध्वजाखाली नोंदणीकृत असलेले मालवाहू जहाज असल्याचे समोर आले आहे. जहाज ३१ ऑगस्टपासून किंगदाओ येथील शिपयार्डमध्ये दुरुस्तीसाठी उभे होते.
या दुर्घटनेनंतर मोठ्या प्रमाणावर बचाव आणि आपत्कालीन पथके घटनास्थळी दाखल झाली. चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी बचावकार्याला वेग देण्याचे तसेच आगीच्या कारणांचा सखोल तपास करण्याचे निर्देश दिले आहेत.
या घटनेनंतर जहाज दुरुस्ती आणि औद्योगिक ठिकाणी असलेल्या अग्निसुरक्षा व्यवस्थेचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे. दुर्घटनेमागील नेमके कारण तपासानंतर स्पष्ट होणार असून, जबाबदारी निश्चित करण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत.