पुणे जवळील चाकण औद्योगिक वसाहतीत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी ही आनंदाची बातमी आहे. यंदा राज्यात दुष्काळी परिस्थिती असली तरी येथील कंपन्यांमध्ये मंदीचे कोणतेही सावट पाहायला मिळत नाही. त्यामुळे बहुराष्ट्रीय कंपन्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना ३० हजार ते ५५ हजार रुपयांपर्यंत बोनस जाहीर केला आहे. या निर्णयामुळे कामगारांमध्ये आनंदाचे व समाधानाचे वातावरण पसरले असून, त्यांना सणासुदीच्या काळात मोठा आर्थिक आधार मिळाला आहे.
चाकण परिसर देशातील एक महत्त्वाची औद्योगिक वसाहत म्हणून ओळखली जाते, जिथे वाहननिर्मिती, वाहनांचे सुटे भाग आणि अभियांत्रिकी विभागातील हजारो कंपन्या कार्यरत आहेत. यामध्ये बजाज ऑटो, महिंद्रा, मर्सिडीज-बेंझ, स्कोडा, फोक्सवॅगन आणि फोर्स मोटर्स यांसारख्या नामांकित कंपन्यांचा समावेश आहे. या वसाहतीत ५ हजारांपेक्षा अधिक कंपन्या असून ५ लाखांपेक्षा जास्त कामगार घाम गाळतात. यामध्ये २० टक्के कायम कामगार आणि ८० टक्के कंत्राटी कामगार आहेत. मोठ्या कंपन्यांतील कर्मचाऱ्यांना वेतन करारानुसार ३० ते ५५ हजार किंवा २० % पेक्षा जास्त बोनस मिळाला आहे, तर छोट्या कंपन्यांतील कर्मचाऱ्यांना एका पगाराएवढा बोनस मिळाला आहे.
स्वाभिमानी श्रमिक कामगार संघटना महाराष्ट्र राज्यचे अध्यक्ष जीवन येळवंडे यांनी सांगितले की, यावर्षी राज्यात दुष्काळाची स्थिती असली तरी औद्योगिक वसाहतीत मंदी नाही. त्यामुळे कंपन्यांनी कामगारांना चांगला बोनस दिला आहे. वर्षभर केलेल्या मेहनतीचे फळ म्हणून दिवाळीत मिळणारा बोनस हा कामगारांसाठी एक आनंदाचा उत्सव असतो. या रकमेतून कामगार सणासुदीची खरेदी, घरखर्च, मुलांचे शाळा कॉलेज अभ्यास खर्च आणि इतर आर्थिक गरजा भागविण्याचे नियोजन करत आहेत.
वाढत्या महागाईमुळे अन्नधान्य, भाजीपाला आणि घरभाड्याचा खर्च मोठ्या प्रमाणात वाढल्याने नियमित पगारातून घर चालवताना कामगारांना कसरत करावी लागते. अशा परिस्थितीत दिवाळीत मिळणारा हा बोनस त्यांच्यासाठी अत्यंत दिलासादायक ठरला आहे. या मेहनतीच्या मोबदल्यामुळे कामगारांचे मनोबल वाढण्यास निश्चितच मदत होणार असून, पुणे परिसरातील बाजारपेठेतही उलाढाल वाढण्याची शक्यता आहे.