शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची आणि दिलासादायक बातमी समोर आली आहे. राज्य सरकारने जाहीर केलेल्या कर्जमाफी योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांचे २ लाख रुपयांपर्यंतचे थकीत कर्ज माफ करण्यात येणार आहे.
राज्यात विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आचारसंहिता लागू असतानाही केंद्रीय निवडणूक आयोगाने या योजनेसाठी विशेष परवानगी दिली आहे. त्यामुळे प्रशासनाला निधी वितरणाचा मार्ग मोकळा झाला आहे.
सरकारी सूत्रांच्या माहितीनुसार, लाभार्थ्यांची पडताळणी प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. ३० जूनपूर्वी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेट रक्कम जमा करण्याचे नियोजन करण्यात आले आहे.
यंदाच्या खरीप हंगामात शेतकऱ्यांना आर्थिक संकटाचा सामना करावा लागू नये यासाठी सरकारने हा निर्णय घेतल्याचे सांगितले जात आहे. बियाणे, खते आणि शेतीसाठी लागणाऱ्या खर्चासाठी ही मदत महत्त्वाची ठरणार आहे.
नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांनाही ५० हजार रुपयांचे प्रोत्साहन अनुदान देण्याचा निर्णय सरकारने कायम ठेवला आहे.