Sunday, 01 November 2026 Pune, Maharashtra
पुणे

कराडमध्ये उंडाळकर आणि धनाजी पाटलांचे शक्तिप्रदर्शन; मतदारांसह मतदान केंद्रावर

सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या कराड सोसायटी मतदारसंघात उदयसिंह पाटील उंडाळकर आणि धनाजी पाटील यांच्यात चुरशीची लढत आहे. दोन्ही उमेदवार मतदारांसह मतदान केंद्रावर पोहोचले.

संपादकीय विभाग
01 Nov 2026, 12:05 PM
2,793 वाचले
News Image

 सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीसाठी रविवारी सकाळी आठ वाजता मतदानाला सुरुवात झाली. कराड सोसायटी मतदारसंघातील लढतीकडे विशेष लक्ष लागले असून, अॅड. उदयसिंह पाटील उंडाळकर आणि धनाजी पाटील यांच्यात थेट सामना होत आहे.

मतदानाच्या पहिल्याच सत्रात दोन्ही उमेदवारांनी मतदारांसह केंद्रावर हजेरी लावली. सकाळी दहाच्या सुमारास धनाजी पाटील माजी सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांच्यासह मतदारांना घेऊन मतदान केंद्रात दाखल झाले. त्यानंतर उंडाळकरही आपल्या समर्थक आणि मतदारांसह मतदानासाठी पोहोचले.

दोन्ही गटांकडून मतदारांना एकत्र आणत मतदान केंद्रावर उपस्थिती दाखवण्यात आली. त्यामुळे कराडमधील निवडणुकीची चुरस मतदानाच्या दिवशीही कायम असल्याचे चित्र दिसले. मतदारसंघातील या लढतीत कोण बाजी मारणार, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

जिल्हा बँकेच्या निवडणुकीसाठी साताऱ्यातील ११ तालुक्यांत मतदान केंद्रे उभारण्यात आली आहेत. १२ जागांसाठी २,०२१ मतदार मतदानाचा हक्क बजावत आहेत. मतदान प्रक्रिया सकाळी आठ ते सायंकाळी पाच या वेळेत पार पडणार असून, मतमोजणी ३ नोव्हेंबरला होणार आहे.