पुणे : जेवण करून शतपावली करण्यासाठी निघालेल्या बँक कर्मचारी तरुणावर किरकोळ वादातून कोयत्याने वार करून खून करण्यात आल्याची धक्कादायक घटना हडपसर भागात घडली. याप्रकरणी हडपसर पोलिसांनी तीन अल्पवीयनासंह एका तरुणाला ताब्यात घेतले. वासुदेव रामचंद्र कुलकर्णी (वय ४७, रा. उत्कर्षनगर, हडपसर) असे खून झालेल्यांचे नाव आहे. याबाबत कुलकर्णी यांच्या भावाने हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. कुलकर्णी कुटुंबीयांसह उत्कर्षनगर भागात राहायला आहेत. कुलकर्णी एका खासगी बँकेत कर्मचारी आहेत.
रविवारी रात्री साडेदहाच्या सुमारास ते शतपावली करण्यासाठी बाहेर पडले. उत्कर्षनगर परिसरातील पदपथावरुन ते निघाले होते. त्यावेळी पदपथावर थांबलेल्या अल्पवयीनांशी त्यांची किरकोळ कारणावरुन बाचाबाची झाली. गुन्हेगारी प्रवृत्तीच्या अल्पवयीनांनी कुलकर्णी यांच्यावर कोयत्याने वार केले. या घटनेत ते गंभीर जखमी झाले. त्यांच्यावर हल्ला करून मुले पसार झाली.
कुलकर्णी पदपथावर रक्ताच्या थारोळ्यात पडल्याची माहिती नागरिकांनी दिली. त्यानंतर त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारांपूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच हडपसर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष पांढरे यांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला. हडपसर भागातील बंटर स्कूल परिसरातील वसाहतीत राहणाऱ्या तीन अल्पवयीन मुलांसह एकाला ताब्यात घेण्यात आले. चौकशीत त्यांनी किरकोळ वादातून कुलकर्णी यांच्यावर कोयत्याने वार केल्याची कबुली दिली. कुलकर्णी यांची मुलांशी ओळखदेखील नाही. शतपावलीसाठी कुलकर्णी बाहेर पडले होते. पदपथावर थांबलेल्या मुलांशी किरकोळ वाद झाला. बाचाबाचीतून त्यांनी खून केल्याचे तपासात निष्पन्न झाले, अशी माहिती हडपसर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष पांढरे यांनी दिली. पोलीस निरीक्षक पांढरे तपास करत आहेत.
हेही वाचा >>> Vanraj Andekar Shot Dead : वनराज आंदेकरांवर बहिणीच्या पतीकडून गोळीबार; मालमत्तेच्या वादातून आंदेकरांचा खून
शहरात २४ तासात दोन खून
राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांचा रविवारी नाना पेठेत खून झाल्याची घटना घडली. त्यानंतर रात्री हडपसर भागात एका बँक कर्मचारी तरुणावर तीक्ष्ण शस्त्राने वार करून खून करण्यात आल्याची घटना उघडकीस आली. बँक कर्मचाऱ्याचा किरकोळ वादातून अल्पवयीनांनी खून केल्याचे उघडकीस आल्यानंतर हळहळ व्यक्त करण्यात आली.
Leave a Reply